पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र
आंद्रा धरणातून पुन्हा 80 एमएलडी पाणी मिळण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, अपुरा, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी कायम आहेत.
आंद्रा धरणातून मिळणा-या पाण्यात मोठी घट झाली होती. चार दिवस 21 एमएलडी पाणी शहरासाठी मिळाले होते. पाण्याची तूट निर्माण झाल्याने समाविष्ट गावांसह उपनगरांमध्ये पाणी समस्या भीषण झाली होती. वाकड, थेरगाव, ताथवडे, पुनावळे, च-होली, मोशी, डुडुळगाव या उपनगरांमध्ये पाणी समस्या गंभीर झाली होती. महापालिका प्रशासनाने पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांशी चर्चा केली. त्यानुसार पूर्वीप्रमाणे 80 एमएलडी पाणी मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा पूर्ववत झाला आहे. मात्र, तक्रारी कायम आहेत.
शहरवासीयांना मावळातील पवना धरणातून आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिका दिवसाला पवना धरणातून 520, आंद्रातून 80 आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून 15 असे 615 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलते. त्यानंतरही पाणीपुरवठ्याच्या तक्रारी कायम आहेत.