आमदार शंकर जगताप यांच्याकडून अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना
पिंपरी ः टीम न्यू महाराष्ट्र
किवळे, मुकाई चौकाजवळील ‘साई ओरा’गृहरचना संस्थेजवळील लेबर कॅम्प आणि अनधिकृत झोपडपट्टी हटविण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक मधुकर भोंडवे यांनी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर पांडुरंग जगताप यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात दीपक भोंडवे यांनी आमदार जगताप यांची भेट घेत ही मागणी केली. किवळे मुकाई चौक हा परिसर झपाट्याने विकसित होत आहे. मागील काही काळापासून उभारण्यात आलेल्या लेबर कॅम्प आणि अनधिकृत झोपडपट्ट्यांमुळे परिसरातील सदनिका धारकांना , ज्येष्ठ नागरिकांना तसेच मुख्यतः महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. या भागात चोरी व लुटमारीच्या घटनांमुळे अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील काही दिवसात अशा अनेक घटना घडल्या असून परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण झाल्याकडे भोंडवे यांना आमदार जगताप यांचे लक्ष वेधले.
दरम्यान, भोंडवे यांच्यासह उपस्थित असलेल्या मुकाई चौक परिसरातील सोसायट्यांमधील नागरिकांनीही मुकाई चौकाजवळील अवैध झोपडपट्टी आणि लेबर कॅंम्पमुळे निर्माण झालेल्या समस्यांचा पाढा आमदार जगताप यांच्यासमोर वाचला. तसेच या समस्यांपासून सुटका करण्यासाठी लवकरात लवकर कारवाई करण्याची आग्रही मागणी या नागरिकांनी लावून धरली.
आमदार जगताप यांची घेतली तात्काळ दखल
दीपक भोंडवे आणि मुकाई चौक परिसरातील साेसाट्यांमधील नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतल्यांनर तसेच या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत आमदार जगताप यांनी त्वरित संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला, मुकाई चौकातील परिस्थिती संदर्भात काही सूचना करत तातडीने संबंधीत ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व सदनिका धारकांना व नागरिकांना सुरक्षेतेबाबत आश्वस्त करण्यात आले. त्यामुळे दीपक भोंडवे यांच्यासह उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त करीत आमदार जगताप यांचे आभार मानले.