पुणे : टीम न्यू महाराष्ट्र
झाडावर फांद्या कापण्यासाठी चढलेला इसम झाडावरच अडकला. ही घटना आज (बुधवारी) सकाळी कोंढवा येथे घडली.
वर्दी मिळताच अग्निशमन दलाकडून कोंढवा खुर्द अग्निशमन वाहन तसेच मुख्यालयातून एक रेस्क्यू व्हॅन आणि उंच शिडीचे ब्रॉन्टो वाहन अशी एकुण तीन वाहने रवाना करण्यात आले होते. झाड तब्बल 20 ते 30 फूट उंच होते. तातडीने झाडाच्या येथे शिडी लावून जवान झाडावर चढत त्याठिकाणी पोहोचले. तेथे सदर इसम अत्यंत घाबरलेल्या स्थितीत असल्याचे जाणवले. जवानांनी प्रथम त्याच्याशी संवाद साधत धीर दिला व तिथे आजुबाजूला असणाऱ्या फांद्या “ट्रि प्रुनर” या उपकरणाने छाटून त्याच्या जवळ जाऊन रश्शीचा उपयोग करत सुमारे पंधरा मिनिटात त्याला सुखरुप खाली उतरविले. अडकलेला इसम रामा पवार (वय 28, रा. वानवडी) यांनी व स्थानिकांनी जवानांचे आभार मानले. सदर घटनेत रामा पवार हे किरकोळ स्वरूपात जखमी असल्याने व ते घाबरलेल्या परिस्थितीत असल्याने त्यांना रुग्णवाहिकेतून नजीकच्या रुग्णालयात रवाना करण्यात आले. अडकलेला इसम हा झाडाच्या फांद्याची छाटणी करण्याकरिता वर चढला होता असे समजले. ही कामगिरीत अग्निशमन अधिकारी समीर शेख, कैलास शिंदे व तांडेल राहुल बांदल आणि वाहनचालक राहुल जाधव, चिमेंद्र पवार तसेच फायरमन किशोर कारभार, प्रसाद शिंदे, रामराज बागल, संतोष माने, सागर शिर्के, तेजस पटेल, प्रथमेश सागवेकर, वैभव बकरे यांनी सहभाग घेतला.