दिघी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे भाजपा आमदारांच्या प्रचारासाठी ‘खुलेआम सहकार्य’

-महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांची निवडणूक विभागाकडे तक्रार

-पोलीस कर्मचाऱ्यांची थेट नावे घेऊन निवडणूक विभागाकडे तक्रार; पोलीस यंत्रणेचे दबावाखाली काम

-कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ‘त्या’ पोलिसांवर कारवाई करा – अजित गव्हाणे

-निवडणुकीत भाजप संलग्न पोलीस कर्मचाऱ्यांची तोतयागिरी; गुन्हा दाखल करण्यासाठी गव्हाणेंचे पत्र

भोसरी 17 नोव्हेंबर

भोसरी विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणूक प्रचारामध्ये
तोतयागिरी करणाऱ्या भारतीय जनता पक्षाशी सलंग्न पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभेचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे यांना पत्र दिले आहे.

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे यांना दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, भोसरी विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार आमदार महेश लांडगे यांचे कार्यकर्ते पोलीस यंत्रणेतील ‘ऑन ड्युटी’ दिघी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी स्वप्निल लांडगे, सुधीर डोळस व युनिट तीनचे शशिकांत नांगरे यांना हाताशी धरून प्रचार करण्याकरिता “खुलेआम सहकार्य” करीत आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक आमदारांची मर्जी राखण्यासाठी पोलिस यंत्रणा दबावाखाली काम करत आहे. त्यामुळे दिघी, चऱ्होली परिसरातील नागरिक तक्रार दाखल करण्यास घाबरत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या प्रकारामध्ये नाव नमूद केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी. अशी मागणी महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी केली आहे.

Share

Leave a Reply