– ह. महम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जुलूसमध्ये गव्हाणे यांचा सहभाग
भोसरी: टीम न्यू महाराष्ट्र
मानवता हा इस्लाम धर्मचा पाया आहे. हजरत महम्मद पैगंबर यांनी या मानवता धर्माची शिकवण आयुष्यभर दिली. संपूर्ण मानव जात ही समान असल्याची विश्वबंधुत्वाची संकल्पना मांडून शांती व एकतेचा प्रसार केला. हजरत महम्मद पैगंबर हे कर्ते सुधारक होते. समाजातील अनिष्ट चालीरितींना आळा घालून त्यांनी समृद्ध समाजाची पाया-भरणी त्यांनी केली. आज याच शिकवणीची नितांत गरज असल्याची भावना स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी व्यक्त केली.
पिंपरी-चिंचवड शहरात ईद-ए-मिलाद अर्थात हजरत महम्मद पैगंबर यांची जयंती गुरुवारी (दि.१९) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड शहर जुलूस कमिटी यांच्या वतीने करण्यात आले होते. यानिमित्त मुस्लिम बांधवांनी काढलेल्या जुलूस मध्ये स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे सहभागी झाले. यानिमित्ताने माजी महापौर वैशाली घोडेकर, माजी विरोधी पक्षनेते राहुल भोसले, माजी नगरसेवक पंकज भालेकर, तानाजी खाडे, विनायक रणसुभे, पक्षाचे युवक शहराध्यक्ष इम्रान खान, युवराज पवार उपस्थित होते.
मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त जुलूस काढण्यात आला. निगडी, पिंपरी, नेहरूनगर, चिखली, कुदळवाडी तसेच दिघी भागामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हे कार्यक्रम हाजी युसुफ कुरेशी, गुलाम रसूल सय्यद, इद्रिस मेमन, जीशान सय्यद, फजल शेख, हबीब शेख अझहर खान, फारुक शेख, अकबर मुल्ला यांच्या पुढाकारातून संपन्न झाले. या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात गव्हाणे यांनी उपस्थिती दर्शवली तसेच मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी गव्हाणे म्हणाले ह.महम्मद पैगंबर यांचे संपूर्ण जीवन आदर्शवत होते. सभ्यता, विनम्रता, शत्रूंना माफ करणे, द्वेषभावना न बाळगणे याची शिकवण त्यांनी आयुष्यभर दिली. कितीही कठीण प्रसंग आले, तरी सत्याचा मार्ग सोडायचा नाही असे ते सांगत. यांच्या विचाराचे अनुकरण करण्यासाठी मुस्लिम बांधव हजरत पैगंबर यांची जयंती साजरी करतात त्यांच्या आदर्शाचे पालन सर्वांनीच केले पाहिजे असेही गव्हाणे यावेळी म्हणाले.