धानोरीत वादळी पावसामुळे १०० वाहनांचे नुकसान; पार्किंग उद्ध्वस्त

पुणे : टीम न्यू महाराष्ट्र

धानोरीत वादळी पावसामुळे तब्बल १०० वाहनांचे नुकसान झाले आहे. येथील अनेक सोसायट्यांतील पार्किंग पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. बिल्डरांनी बांधकाम करताना काळजी घेतली नाही. त्यामुळेच नागरिकांना संकटांचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

येथील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पार्किंगमध्ये उभी केलेली सुमारे १०० ते १२० वाहने पाण्याखाली गेल्याने त्यांचे नुकसान झाले. अगदी नव्या कारही पाण्यात बुडाल्याने निकामी झाल्या. खराडी परिसरातही पाणी शिरल्याने घरातील सामानाची नासाडी होऊन रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुणे महानगरपालिका (पीएमसी) आपत्ती व्यवस्थापनाला मदतीसाठी सुमारे १०० हून अधिक फोन आले. त्यांना प्रतिसाद देताना महापालिकेच्या नाकीनऊ येत होते.

बावधनमध्ये रस्त्यावर लोखंडी आणि सिमेंट चेंबर असतात. महापालिकेने पावसाळ्यापूर्वीच ते दोन्ही साफ करणे अपेक्षित आहे. परंतु तसे झाले नसल्यामुळे पूर स्थिती उदभवली. फक्त एका दिवसाच्या पावसात ही परिस्थिती झाली आहे. मोठ्या आकाराच्या जलवाहिन्या टाकण्याची सूचना येथील नागरिकांनी महापालिकेला अनेक दिवसांपासून केली . कोरेगाव पार्कमधील ५ नंबर लेनमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठले होते. टिळक रोड ते कल्याणीनगरपर्यंतचा संपूर्ण परिसर जलमय झाला होता. असाच मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास पुढील दोन महिने नागरिकांना प्रचंड त्रास होऊ शकतो.खराडीमध्ये पाणी साचण्यासाठी जास्त पावसाची गरज नाही, अगदी थोड्या पावसातही रस्ते पाण्याने भरून जातात. विशेषत: ढोले पाटील रस्त्यावर अशी स्थिती होऊ शकते. ड्रेनेजची साफसफाई होत नसल्याने पाण्याला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे. सोसायट्यांमध्ये बॅकफ्लो होत असल्याने सांडपाणी आणि पावसाचे पाणी पुढे जाऊ शकत नाही. खराडीमध्ये प्रत्येक रस्त्यावर काम सुरू आहे. पाऊस सुरू झाल्यावर पाणी साचण्याचे प्रकार वाढले आहेत.

Share

Leave a Reply