रेल्वे स्थानकावर मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे विभागाचे प्रयत्न

पुणे : टीम न्यू महाराष्ट्र

प्रत्येक रेल्वे स्थानकावर प्रवाशांना वेगवेगळ्या कारणांसाठी मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. उन्हाळा वाढत असतानाच पाण्याची टंचाई लक्षात घेत प्रवाशांना पाण्यामुळे कोणत्या अडचणी येऊ नये यासाठी रेल्वे प्रशासन तयारी करत आहे. याबाबत पुणे विभागीय पाणी समितीची बुधवारी (दि. 17) पुणे येथे बैठक पार पडली.

पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे होत्या. या बैठकीला पुणे विभागाचे सर्व शाखा अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत वरिष्ठ विभागीय इंजिनीयर (समन्वय) व्ही.के. राय, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता (सामान्य) श्री पराग, वरिष्ठ विभागीय अभियंता (उत्तर) मनीष के. सिंह, वरिष्ठ विभागीय अभियंता (ईशान्य) मोहम्मद फैज आणि विभागीय अभियंता (दक्षिण) विकास कुमार आणि पुणे विभागाच्या इंजीनियर आणि विद्युत विभागातील इंजीनियर तसेच इतर निरीक्षकांनी सहभाग घेतला. पाणी उपलब्धता आणि त्याच्या व्यवस्थापनाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी आणि कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी पाणी समितीची बैठक घेण्यात आली. विभागीय स्तरावर रेल्वे स्थानकांवर मुबलक पाणी उपलब्ध असावे, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पाणी उपलब्धतेबाबत कोणतीही चूक होता कामा नये, असेही निर्देश अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बी. के. सिंह यांनी दिले आहेत.

उन्हाळा वाढत आहे. त्यात पुणे रेल्वे विभागातील अनेक शहरांमध्ये ठिकठिकाणी पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. रेल्वे विभागाने प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक शहरांसाठी विशेष उन्हाळी रेल्वे सोडल्या आहेत. त्या गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. असे असताना प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे विभागाने सर्व स्थानकांवर मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. बैठकीचे संचालन व्ही. के. राय यांनी केले.

Share

Leave a Reply