पुणे : टीम न्यू महाराष्ट्र
‘डॉक्टर आणि रुग्ण या नात्यात विश्वास हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. तोच अलीकडे कमी होत आहे. तो पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे साह्य होणार असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे. डॉक्टर@ डोअर सारख्या अॅपच्या सुविधा यासाठी स्वागतार्ह आहेत, असे मत ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ आणि अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी येथे व्यक्त केले.
अशोककुमार सुरतवाला आणि अनिरुद्ध बंबावाले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘डॉक्टर@ डोअर’ या अॅपच्या लोकार्पण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, अशोककुमार सुरतवाला, अनिरुद्ध बंबावाले आणि डॉ. चंद्रशेखर कर्वे व्यासपीठावर उपस्थित होते. सदर कार्यक्रम भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर येथे नुकताच संपन्न झाला.
डॉ. आगाशे यांनी वैद्यकीय व्यावसायिकांना आणि रुग्णांना एकमेकांवरील विश्वास जपण्याचे आवाहन केले. रुग्णाने धीर धरणे, थोडी सहनशील वृत्ती ठेवणे, न घाबरता खंबीर राहणे आवश्यक आहे. तसेच डॉक्टरांनी रुग्णाचा विश्वास जपणे, त्याला धीर देणे, आश्वस्त करणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
अनिरुद्ध बंबावाले यांनी ‘डॉक्टर@ डोअर’ ही संकल्पना स्पष्ट केली. ‘एकत्र कुटुंबात वाढताना, आधीच्या काळात वैद्यकीय सुविधांपर्यंत पोहोचताना रुग्णांना येणाऱ्या अडचणी, समस्या मी जवळून अनुभवल्या. विशेषतः आजच्या धावपळीच्या, स्पर्धात्मक आणि ताणतणावग्रस्त जीवनात तंत्रज्ञानाची मदत घेऊन रुग्णांना कमीतकमी वेळात वैद्यकीय साह्य मिळवून देण्यासाठी काय करता येईल, या विचारातून या ‘डॉक्टर@ डोअर’ संकल्पनेचा जन्म झाला”, असे ते म्हणाले.
भूषण गोखले म्हणाले, की डॉक्टर@ डोअर या अॅपचा रुग्णांना उपयोग होईल. समाजात फॅमिली डॉक्टर ही संकल्पना पुन्हा रुजण्यास मदत होईल. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे दिवसेंदिवस या अॅपमध्ये नव्या सुविधा समाविष्ट होतील आणि ते अधिकाधिक समाजोपयोगी होत जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
डॉ. चंद्रशेखर कर्वे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. त्रिपुर पटेल यांनी डॉक्टर@ डोअर या अॅपचे प्रात्यक्षिक सादर केले. आरती आगाशे आणि सुचेता घाटे यांनी गणेशस्तवन सादर केले. तर रोहिणी बंबावाले गोखले यांनी सूत्रसंचालन केले.