पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र
पुणे, अहमदनगर आणि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वाहन चोरी करणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या 14 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
शुभम अशोकराव लोंढे (वय 21, रा. आळंदी, पुणे), सचिन समाधान दळवी (वय 23, रा. आळंदी, पुणे), यश शिवाजी भोसले (रा. आळंदी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे दरोडा विरोधी पथकातील पोलीस माहिती काढत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार अमर कदम, गणेश कोकणे यांना माहिती मिळाली की, चोरीची दुचाकी घेऊन दोघेजण आळंदी बस स्टॉपवर येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन शुभम आणि सचिन या दोघांना दुचाकीसह ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत माहिती काढली असता ती दुचाकी आळंदी परिसरातून चोरीला गेल्याचे समजले. त्यामुळे दोघांना अटक करून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या तिसऱ्या साथीदारासोबत मिळून 14 दुचाकी वाहने चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी तिसरा साथीदार यश भोसले यालाही अटक केली. तिघांकडून 14 दुचाकी वाहने जप्त केली.
या वाहनांबाबत आळंदी, चिखली, महाळुंगे एमआयडीसी, वाळूंज, लोणी काळभोर, शिक्रापूर, संगमनेर, आळेफाटा पोलीस ठाण्यांमध्ये 14 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये 12 दुचाकी हिरो स्प्लेंडर कंपनीच्या आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार महेश खांडे, राहुल खारगे, उमेश पुलगम, विक्रांत गायकवाड, नितीन लोखंडे, आशिष बनकर, प्रवीण कांबळे, सागर शेडगे, प्रवीण माने, गणेश कोकणे, औदुंबर रोंगे, गोविंद सुपे, अमर कदम, समीर रासकर यांनी केली.