दिल्ली : टीम न्यू महाराष्ट्र
एअर इंडिया एक्सप्रेसच्या 300 सिनियर कॅबीन क्रू कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी वैद्यकीय कारण सांगत सुट्टी घेतली आहे. तसेच हे कर्मचारी मंगळवार (दि. 7) सायंकाळ अप्सून मोबाईल देखील बंद करून बसले आहेत. कर्मचाऱ्यांच्या अचानक एकाच वेळी रजेवर जाण्याने एअर इंडिया एक्सप्रेसच्या उड्डाणांवर मोठा परिणाम झाला आहे. देशभरातील 82 उड्डाणे यामुळे रद्द करण्यात आली आहेत. मंगळवारी सायंकाळी या कर्मचाऱ्यांनी अचानक आजारपणाचे कारण सांगत रजा घेतली. टाटा समूहाच्या एअर इंडिया कंपनीसोबत एअर इंडिया एक्सप्रेस, एअर एशिया, विस्तारा या कंपन्यांचे विलीनीकरण झाले आहे. हे विलीनीकरण आणि अन्य कारणांवरून एअर इंडिया एक्सप्रेस मधील कर्मचारी नाराज आहेत.ही नाराजी या रजा नाट्यावरून समोर आली आहे. याला आंदोलन म्हणता येणार नाही, मात्र कर्मचाऱ्यांमध्ये असलेली नाराजी दूर करण्यासाठी एअर इंडिया एक्सप्रेस युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. मंगळवार सायंकाळ पासून डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल अशी एकूण 82 उड्डाणे रद्द झाली आहेत. काही उड्डाणे रद्द झाली तर काही उड्डाणे विलंबाने झाली आहेत. उड्डाणे रद्द झालेल्या प्रवाशांना पूर्ण रिफंड अथवा इतर तारखेला तिकीट देण्यात येणार असल्याचे एअर इंडिया एक्सप्रेस कडून सांगण्यात आले आहे.