निवडणुका संपेपर्यंत टोल दरवाढ नाही

मुंबई – लोकसभा निवडणुक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणतीही दरवाढ लागू करू नये, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे 1 एप्रिल पासून होणारी टोल दरवाढ पुढील दोन महिन्यांसाठी टळली आहे.

दरवर्षी 1 एप्रिल पासून टोलच्या दरांमध्ये वाढ केली जाते. यावर्षी ही वाढ अद्याप झालेली नाही. त्यामुळे वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. दरवर्षी सुमारे पाच टक्के वाढ केली जाते. मात्र यावर्षी निवडणुका असल्याने ही दरवाढ निवडणूक कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत लागू करू नये अशा सूचना निवडणूक आयोगाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिल्या आहेत.

वाढती महागाई आणि इतर अनुषंगिक बाबींवर टोल दरवाढ आधारित असते. महागाईच्या प्रमाणात ही दरवाढ दरवर्षी 1 एप्रिल पासून लागू केली जाते. यावर्षी देखील प्रशासनाने टोल दरवाढ केली आहे. मात्र तिची अंमलबजावणी केलेली नाही.

निवडणूक काळात टोल दरवाढीवरून कोणतेही वादंग नको, म्हणून निवडणुका होईपर्यंत ही दरवाढ लागू न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम संपणार आहे. त्यामुळे त्यानंतर ही दरवाढ होण्याची शक्यता आहे.

Share

Leave a Reply