अहमदनगर : टीम न्यू महाराष्ट्र
अहमदनगर लोकसभा मतदार संघातील नवनिर्वाचीत खासदार निलेश लंके वादात अडकण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटातील या खासदाराने गुंड गजा मारणे याची भेट घेतली आहे. त्यानंतर निलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कार स्वीकारला आहे. यामुळे यावरुन आता राजकीय वाद रंगणार आहे. राजकाणातील गुन्हेगारीकरण यामुळे समोर आले आहे. यापूर्वी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गजा मारणेची भेट घेतली होती. त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवार याला फटकारले होते, असे अजिबात घडता काम नये, असे बजावले होते.
गजानन मारणेचं मुळ गाव मुळशी तालुक्यात आहे. कुख्यात गुंड गजानन मारणे उर्फ गजा मारणे हा मारणे टोळीचा म्होरक्या आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणामध्ये गजा मारणे याला अटक झाली होती. या खून प्रकरणात न्यायालयाने त्याला शिक्षाही दिली होती. त्यानंतर गजा मारणे तीन वर्ष पुण्यातील येरवडा कारगृहात होता. मारणे आणि मोहोळ टोळीचा पुण्यात दबदबा आहे.
अहमदनगर लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांना निलेश लंके यांनी पराभूत केले होते. या निवडणुकीत निलेश लंके यांना 6 लाख 24 हजार 797 मते मिळाली. सुजय विखे यांना 5 लाख 95 हजार 868 मते मिळाली होती. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत 28 हजार 929 मतांनी निलेश लंके यांचा विजय झाला.निलेश लंके लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. परंतु लोकसभा निवडणुकी दरम्यान त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या पक्षात प्रवेश केला. त्यानंतर शरद पवार यांनी त्यांना लोकसभेचे तिकीट दिले होते. आता गुंड गजा मारणे याची भेट निलेश लंके यांनी घेतल्यानंतर शरद पवार काय बोलतात? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.