देहूगाव ः टीम न्यू महाराष्ट्र
गीता भागवत करीती श्रवण
अखंड चिंतन विठोबाचे
तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा
तरी माझ्या दैवा पार नाही
आषाढी वारी काळात सेवेला फार मोठे महत्व असल्याने तसेच वारकरी सेवेचे संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावेत, त्यांच्या हातातून वारकऱ्यांची सेवा घडवी, या हेतुने साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी संचलित एच. ए. बरलोटा मेमोरियल विस्डम इंग्लिश मिडीयम हायस्कूल विकासनगर ( किवळे) देहूरोड यांच्या वतीने संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले.
संस्थेच्या वतीने गेल्या 29 वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. देहू येथील संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी शेकडो वारकऱ्यांना खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी शहराध्यक्ष ॲड. कृष्णा दाभोळे यांनी श्रीफळ अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात केली. यावेळी विस्डम इंग्लिश मिडीयम हायस्कूलचे अध्यक्ष जयशंकर जयसिंग, संस्थेचे खजिनदार के. के. पिल्ले, सचिव दिलीपकुमार नायर, संचालक शशीधरण नायर, शाहसाब शेख, तंगराजन नाडार, शाळेचे क्रीडा शिक्षक संजय पाटील व स्काऊट गाईडचे विद्यार्थी उपस्थित होते. या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना वारकऱ्यांना अन्नदान करण्यासाठी सहकार्य केले.