मुंबई: टीम न्यू महाराष्ट्र
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजपला जोरदार फटका बसला. महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत यश मिळवले. २०१९ च्या निवडणुकीत २२ जागांवर यश मिळवणाऱ्या भाजपला फक्त ९ जागांवर विजय मिळवता आला. लोकसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात अपेक्षित यश मिळालं नाही, याची कबुली दिली. तसेच त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कितीही गणितं मांडली तरी आमच्या जागा कमी आल्या आहेत हे वास्तव मान्य करावं लागेल. या निवडणुकीचं नेतृत्व भाजपाकडून मी करत होतो. त्यामुळे ज्या काही जागा कमी आल्या असतील, त्याची जबाबदारी माझी आहे. मी मान्य करतो की मी स्वत: यात कमी पडलो आहे. ती कमतरता भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.सध्या देवेंद्र फडणवीसांवर महाराष्ट्र सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपद व इतर महत्त्वाच्या खात्यांचा कारभार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला या सर्व जबाबदाऱ्यांमधून मोकळं करून राज्यात पक्षाच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करण्याची परवानगी मिळावी, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.