स्वराज्य पक्षाचा पिंपरी चिंचवड महापालिकेला इशारा
चिखली ः टीम न्यू महाराष्ट्र
साने चौक ते चिखली चौक हा १२५ फूट रस्ता मंजूर असून देखील प्रलंबित आहे. या रस्त्याबाबत येत्या ८ दिवसात तोडगा न काढल्यास स्वराज्य पक्ष व स्थानिक नागरिकांच्या वतीने जनहितासाठी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा स्वराज्य पक्षाचे शहराध्यक्ष विजय जरे यांनी दिला आहे.
याबाबत जरे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. महानगरपालिकेने साने चौक ते चिखली हा रस्ता १२५ फूट रस्ता मंजूर करून देखील अद्याप रस्ता रुंदीकरण करण्यात आलेले नाही. हा रस्ता परिसरातील रहदारीचा मुख्य रस्ता आहे. ह्या रस्त्यावर परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात ये -जा करत असतात. त्या मुळे साने चौक ते चिखली दरम्यान वारंवार वाहतूक कोंडी होते तसेच अत्यावश्यक सेवा देखील वेळेवर पोहचू शकत नाही. या मुळे परिसरातील नागरिक त्रस्त झालेले आहेत. याला सर्वस्वी जबाबदार महानगरपालिकेचा गलथान कारभार जबाबदार असल्याचा आरोप जरे यांनी केला आहे.
राजकीय श्रेयासाठी रुंदाकरण रखडले
या रस्त्याच्या कामाची निविदा काढली असली तरीही राजकीय श्रेयासाठी रुंदाकरणाचे काम प्रलंबित ठेवण्यात आले. याचा संपूर्ण त्रास हा चिखलीमधील सर्व सामान्य नागरिकांना होत आहे. प्रशासनाने तात्काळ रस्ता रुंदाकरणाचे काम सुरु करावे. अन्यथा परिसरातील नागरिकांसह स्वराज्य पक्षाच्या वतीने रास्ता रोको करण्याचा इशारा जरे यांनी निवदेनात दिला आहे. तसेच यासाठी त्यांनी महापालिकेला आठ दिवसांची मुदत दिली आहे.