पिंपरी चिंचवड पोलीस दलातील एक अधिकारी, चार अंमलदारांचा गौरव

पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र

पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील एक अधिकारी आणि चार पोलीस अंमलदारांचा पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह आणि प्रशासकीपत्राने गौरव करण्यात आला. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सन्मानचिन्ह प्रदान केले. तसेच केलेल्या गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

राज्य पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच गुणवत्तापूर्ण सेवा बजावणाऱ्या 800 जणांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. राज्य पोलीस सेवेतील सहायक आयुक्त ते उपायुक्त दर्जाचे 31 अधिकारी, 54 पोलीस निरीक्षक, 24 सहायक निरीक्षक, 49 उपनिरीक्षक, 140 सहायक उपनिरीक्षक, 333 पोलीस हवालदार, 51 पोलीस नाईक, 108 पोलीस शिपाई यांचा समावेश आहे.

दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी दरम्यान देशभरातील सुरक्षा यंत्रणेत कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती शौर्य पदक (पीएमजी), पोलीस शौर्य पदक (जीएम), राष्ट्रपती पदक (पीएसएम) अशी पदके जाहीर केली जातात. या पदकांसाठी प्रत्येक राज्यातील घटकांमधून शिफारशी सादर केल्या जातात. त्याचप्रमाणे राज्यात देखील पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र जाहीर केले जाते.

महाराष्ट्र दिनी भारतीय पोलीस सेवेतील 6 अधिकारी, पोलीस उपायुक्त ते सहायक आयुक्त दर्जाच्या 31 अधिकाऱ्यांसह 800 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना सन 2023 सालचे पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले.

गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक गोरख ज्ञानोबा कुंभार, हिंजवडी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक बंडू बबन मारणे, पोलीस मुख्यालयातील पोलीस हवालदार चंद्रधर किसन कोंडे, गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार सचिन नामदेव चव्हाण, चाकण पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार हनुमंत जयराम कांबळे यांना महाराष्ट्र दिनी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह प्रदान केले.

Share

Leave a Reply