पिंपरी ः टीम न्यू महाराष्ट्र
शिर्डी येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावले, तर पंजाब संघ उपविजेता ठरला. दरम्यान, या स्पर्धेत पिंपरी चिंचवडच्या खेळाडूंनी ५ सुवर्ण व २ टायटल बेल्ट पटकावून घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेत विविध राज्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये 14 वर्ष आणि 17वर्ष वयाेगटात महाराष्ट्र संघाने प्रथम व पंजाब संघाने द्वितीय क्रमांक पटकविला. या स्पर्धेत महाराष्ट्र संघातून खेळणाऱ्या पिंपरी चिंचवडच्या पाच खेळाडूंनी 5 सुवर्ण पदक व 2 टायटल बेल्ट मिळवत यश संपादन केले. 14 वर्षांखालील गटातील संघात सहभागी झालेल्या सार्थक जाधव, प्रतिक दन्ने यांनी सुवर्ण पदक, तर इसक्की तेवर याने सुवर्ण पदकासह टायटल बेल्ट पटकावला. तर 17 वर्षांखालील वयाेगटातील संघात सहभागी झालेल्या अमिन आत्तार याने सुवर्ण पदक तसेच असिफ शेख याने सुवर्ण पदकासह टायटल बेल्टवर आपले नाव कोरले. या विजयी खेळाडूंची थायलंड, बॅंकॉक येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
या सर्व यशस्वी खेळाडूंचे सिद्धिविनायक पब्लिक स्कूल ॲन्ड ज्युनियर कॉलेजचे संस्थापक/सचिव मारूती जाधव, अध्यक्षा निर्मला जाधव, राष्ट्रीय थायबॉक्सिंग संघटनेचे चेअरमन पी. वाय. आत्तार, सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विजयी सर्व खेळाडूंना गणेश मांढरे यांचे मार्गदर्शन लाभले.