पिंपरी: टीम न्यू महाराष्ट्र
मावळ, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी अक्षरशः धुरळा उडवला आहे. या तीनही लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभेसह बारामती लोकसभा मतदारसंघात समावेश असलेल्या ताथवडे भागात नमो संवाद सभांच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांशी संवाद साधण्यात येत आहे. या सभांना सर्व वर्गातील मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. मोदी सरकारची गेल्या १० वर्षांतील कामगिरी सांगताना राम मंदिर, मेट्रो, डिजीटल इंडिया, विविध कल्याणकारी योजना आणि विकसित भारताचा संकल्प अशा विविध गोष्टींवर मतदारांशी संवाद साधून महायुतीला विजयी करण्याचे आवाहन शंकर जगताप करत आहेत.
गेल्या पाच-सहा दिवसांपासून भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप व पक्षाचे सर्व पदाधिकारी दररोज किमान ४ ते ८ नमो संवाद सभा घेत आहेत. रावेत येथून या सभांना प्रारंभ झाला. या संभांच्या माध्यमातून शंकर जगताप यांनी मावळ, शिरूर आणि बारामती मतदारसंघात महायुतीसाठी जोरदार वातावरण तयार केले आहे. या नमो संवाद सभांना मतदारांचाही उदंड प्रतिसाद मिळत आहे. या संभांच्या माध्यमातून भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी आतापर्यंत सर्व वर्गातील मतदारांशी संवाद साधला आहे. गेल्या दहा वर्षांतील मोदी सरकारची अतुलनीय कामगिरी सांगताना राम मंदिर, मेट्रो, महामार्ग, विकसित भारताचा संकल्प अशा विविध गोष्टींवर संवाद साधत शंकर जगताप हे मतदारांची मतेही जाणून घेत आहेत. मावळ, शिरूर आणि बारामती या तीनही लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना सर्वाधिक मताधिक्याने विजयी करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून शंकर जगताप व भाजपचे पदाधिकारी कामाला लागल्याचे चित्र आहे. शंकर जगताप हे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहून तळागाळात पोहोचून जंनसंपर्क ठेवत आहेत. त्याचाही त्यांना या नमो संवाद सभांच्या आयोजनात फायदा होताना दिसत आहे.
महायुतीच्या उमेदवार सुनेत्राताई पवार यांच्यासाठी ताथवडेत नमो संवाद सभा
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे भारताला भ्रष्टाचारमुक्त आणि अंमलीपदार्थ मुक्त करायचे स्वप्न असून, त्यासाठी सर्व मतदारांच्या आशिर्वादाची गरज आहे. २०२४ ची ही निवडणूक आपल्या देशाचे भाग्य ठरविणारी आहे. विकसित भारतासाठी केंद्रात तिसऱ्यांदा पूर्ण बहुमतातील महायुतीचे सरकार निवडून देवून, बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्राताई पवार यांना मतदान करा, असे आवाहन शंकर जगताप यांच्याकडून करण्यात आले आहे. ताथवडे येथील ऑस्टिन सोसायटी येथे नमो संवाद सभेमध्ये उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी शिक्षण मंडळाचे माजी सभपती चेतन भुजबळ, सोसायटीचे चेअरमन पराग चेन्ने, सचिव अभिषेक सपकाळ, खजिनदार संदीप कानपिळे, संदिप पवार, विजय पवार, अजित पवार, सुप्रिया पवार आदी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड शहर भाजपाकडून महायुतीचा धर्म चोखपणे पाळला जात आहे. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करून महायुतीच्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचाराचे नियोजन करताना कुठलीही कसर न ठेवता कंबर कसून कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
श्रीरंग आप्पा बारणेंसाठी चिंचवड विधानसभेत प्रचार बैठका
मोदी सरकारने अंत्योदया ची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आखलेल्या योजनांमुळे आज देशातील २५ कोटी जनता दारिद्र्यरेषेच्यावर आली आहे. काँग्रेस सरकारच्या काळात संपूर्ण देशात केवळ १४ कोटी गॅस कनेक्शन्स होती. आता मोदी सरकारच्या उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून केवळ १० वर्षात ३१ कोटींहून अधिक गॅस कनेक्शन्स देण्यात आले आहे. मोदी सरकार सर्वसामान्यांसाठी काम कसे करत आहे, याचे हे एक उदाहरण आहे. हेच काम पुढे सुरू राहण्यासाठी श्रीरंगआप्पा बारणे यांना विजयी करून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करा, असे आवाहन शंकर जगताप यांनी केले. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पिंपळे गुरवमधील गंगोत्रीनगर-३ येथे नमो संवाद सभा झाली. यावेळी नगरसेवक शशिकांत कदम, सागर आंगोळकर, माजी स्वीकृत नगरसेवक महेश जगताप, शिवाजी कदम, राहुल जगताप यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
नवी सांगवीतील शितोळेनगर येथे नमो संवाद सभा
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ नवी सांगवीतील शितोळेनगरमध्ये हिरेन सोनवणे यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ नमो संवाद सभा झाली. पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कुणाही समोर न झुकता अविरत विकास कार्य करून जगाच्या पटलावर आपल्या भारत देशाची प्रतिमा उज्ज्वल केली आहे. भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्यास्थानी न्यायची असेल, तर पुन्हा तिसऱ्यांदा मोदी सरकारला विजयी करा म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्री. श्रीरंगआप्पा बारणे यांना मत द्या, असे आवाहन केले. यावेळी माजी महापौर माई ढोरे, मा. नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, नगरसेविका शारदाताई सोनवणे, भाजपा शहर चिटणीस हिरेन सोनावणे, मंडल अध्यक्ष संदीप नखाते, गणेश ढोरे आदी उपस्थित होते.
सांगवीतील मधुबन सोसायटी मध्ये नमो संवाद सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारने गेल्या १० वर्षात १४० कोटी जनतेच्या संतुष्टीसाठी काम केले. या १० वर्षात मोदी सरकारने छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार केले आहे. दहशतवादाचा बिमोड करून देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले. अगदी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक करत आपल्या सैनिकांच्या बलिदानाचा बदला घेतला आहे. एवढेच नाही तर सर्वसामान्यांच्या घरापर्यंत कल्याणकारी योजना पोहोचवून गोरगरीबांचे जीवनमान उंचावण्याचे कार्य केले आहे. या कार्यात खंड पडता कामा नये यासाठी श्रीरंग बारणे यांना मतदान करून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना विजयी करावे, असे आवाहन भाजपातर्फे करण्यात आले. महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ नवी सांगवीतील मधुबन सोसायटी लेन नंबर ५ मधील डॉल्फिन हायस्कूल येथे नमो संवाद सभा झाली. यावेळी महापौर माई ढोरे, मा.नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, मंडल अध्यक्ष संदीप नखाते, गणेश ढोरे, विनायक शिंदे, ऋषिकेश व्हनमाने, अमित गवळी, योगेश ढोरे, हेमंत निघुटकर आदी उपस्थित होते.
शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी बुथ यंत्रणा सज्ज
शिरूर लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपाची बुथ यंत्रणा सज्ज असून, या मतदारसंघातील सर्व शक्तीकेंद्र प्रमुख, मंडल प्रमुख तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी व माजी नगरसेवक प्रभागनिहाय बैठका घेऊन महायुतीच्या विजयासाठी नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भोसरी विधानसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गेल्या निवडणुकीपेक्षा दुप्पट मतदान होईल, असा विश्वास भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ नुकतीच भारतीय जनता पार्टीच्या मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात आढावा बैठक पार पडली. पिंपरी-चिंचवडमधील सुज्ञ मतदारांनी यावेळीही सर्वांगिण विकासाचा विश्वास देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हणजेच महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा चंग बांधला आहे. भारताला विकसित राष्ट्र करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणे ही या देशाची गरज असल्याचे मतदारांच्याही लक्षात आलेले आहे. त्यामुळे महायुतीच्या विजयासाठी भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता वचनबद्ध असल्याची ग्वाही शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली.”