पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र
विधिमंडळाच्या नियमित कामकाजाच्या समन्वयासाठी महापालिका स्तरावर अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तर महापालिकेशी संबंधित विविध विभागांची माहिती शासनाच्या समन्वय कक्षाला पाठविण्यासाठी समन्वयाकरिता विभागीय स्तरावर समन्वय अधिकारी म्हणून अणुविद्युत व दूरसंचार विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश कातोरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने आयुक्त शेखर सिंह यांच्या स्वाक्षरीने याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित केले आहे.
महाराष्ट्र शासन, नगर परिषद प्रशासन संचलनालय स्तरावर महानगरपालिका समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. महापालिकांचे सामाईक धोरण, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाकडून उपस्थित होणा-या बाबी, विधानमंडळ कामकाजाच्या दृष्टीने उपस्थित होणाऱ्या बाबी, अनेक महत्वाच्या बैठकांकरिता माहिती मागविणे, माहिती तयार करणे, कागदपत्रांची शहानिशा करणे आदी कामे या कक्षामार्फत केली जातात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विविध विषय वेगवेगळ्या विभागांद्वारे हाताळले जात असल्याने प्रत्येक विषयाकरिता दरवेळी वेगवेगळ्या विभागांशी समन्वय साधावा लागतो. शिवाय महापालिकेत असलेल्या विभागप्रमुखांच्या अधिनस्त असलेल्या विभागांमध्ये वारंवार बदल होत असल्याने समन्वयाच्या दृष्टीने संचलनालयाच्या स्तरावर अडचणी निर्माण होतात. परिणाम स्वरूप आवश्यक माहिती संकलित करण्यात महत्वाचा कार्यालयीन वेळ खर्ची पडतो. त्यामुळे महापालिकेची माहिती अथवा अहवाल वेळेवर प्राप्त न होणे, शासन आणि लोकप्रतिनिधींचा रोष पत्करावा लागणे आदी कारणांसाठी या संपुर्ण कामकाजाकरिता समन्वय साधण्यासाठी महापालिका स्तरावर स्वतंत्रपणे नोडल अधिकारी नेमण्याचे निर्देश नगरपरिषद प्रशासन संचलनालयाने महापालिकेला दिले होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेसंदर्भात विधीमंडळ आणि नियमित कामकाजाच्या समन्वयाकरिता अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. नगरपरिषद संचलनालयाकडील समन्वय कक्षाशी समन्वय साधून प्राप्त निर्देशाप्रमाणे विषयाशी संबंधित कामकाज करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
महापालिकेची एकत्रित माहिती शासनाच्या मागणीप्रमाणे तातडीने शासनास सादर करावी लागते. अशी माहिती संकलित करून समन्वय कक्षाला पाठविण्यासाठी येणाऱ्या अडचणी तसेच होणारा विलंब विचारात घेऊन विभागीय स्तरावर जबाबदार अधिकारी नेमून त्यांच्यामार्फत माहिती संकलनाचे काम पार पाडण्याकरिता विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांनी महापालिकेस निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने अशा कामकाजाकरिता समन्वय अधिकारी म्हणून अणुविद्युत व दूरसंचार विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश कातोरे यांना समन्वय अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. नगरपरिषद संचलनालय व विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत आदेशात नमूद करण्यात आले आहे.