भोसरीतील युवकांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक
भोसरी, टीम न्यू महाराष्ट्र:
भोसरी पीसीएमटी चौकातील कै. भगवान गव्हाणे मित्र मंडळाच्या युवकांनी चेंबरमध्ये पडलेल्या श्वानाला तासाभराच्या अथक प्रयत्नांनी बाहेर काढले. युवकांच्या सतर्कतेमुळे श्वानाचे प्राण वाचले असून युवकांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भोसरीतील चांदणी चौकातून लांडेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असणाऱ्या चेंबरमध्ये एक श्वान पडलेला होता. या चेंबरपासून ये जा करणाऱ्या नागरिकांना या श्वानाच्या भुंकण्याचा आवाज येत होता मात्र कोणीही लक्ष दिले नाही. येता जाता नागरिक चेंबरमध्ये वाकून पाहत आहेत? हे येथील कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चेंबरची पाहणी केली असता चेंबरमधून श्वानाच्या भुंकण्याचा आवाज या युवकांनी ऐकला. हे चेंबर साधारण चार ते सहा फूट उंचीचे असल्याने या श्वानाला वरच्या वर काढणे शक्य नव्हते. अजित गव्हाणे, रोहित कांबळे, प्रणय फुगे, शुभम गव्हाणे या तरुणांनी श्वानाला वाचविण्याचा निर्धार केला. मंडळाचा एक कार्यकर्ते या चेंबरमध्ये उतरला. दोरी बांधून या श्वानाला बाहेर काढण्यात आले. तासांभराच्या अथक प्रयत्नांनंतर कुत्र्यास विहिरीबाहेर काढण्यात यश आले. उपाशीपोटी व भीतीने व्याकूळ झालेल्या या कुत्र्याला मलमपट्टी करून खायला घालून सोडण्यात आले. कुत्र्याचे प्राण वाचविल्याने युवकांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.