भाषेचा न्यूनगंड बाळगू नये, स्थानिक भाषेत अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यावे – योगेश भावसार

पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र

मराठी माध्यम व सेमी इंग्लिश माध्यम मधून दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेविषयी न्यूनगंड न बाळगता मराठी भाषेतून अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन आपली प्रगती करावी असे मार्गदर्शन पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कुलसचिव प्राध्यापक योगेश भावसार यांनी केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधून १० वी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या २११० विद्यार्थ्यांना करीअर कसे व कोणते निवडावे याचे मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ मार्गदर्शक विवेक वेलणकर यांनी लिहिलेले ‘दहावी नंतरची शाखा निवड’ हे पुस्तक पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) वतीने भेट म्हणून देण्यात आले. यामध्ये पारंपरिक कोर्सेस बरोबरच आयटीआय, डिप्लोमा इंजिनिअरींग पासून फाईन आर्टस् , नर्सिंग, कमवा व शिका, व्होकेशनल कोर्सेस पर्यंतची सविस्तर माहिती आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांना शाळेतून बोर्डाच्या मार्कलिस्ट सोबत देण्यात आले. चिंचवड केशवनगर मनपा शाळेत या पुस्तकवाटपाचा प्रातिनिधिक कार्यक्रम मंगळवारी झाला.
यावेळी पुस्तकाचे लेखक विवेक वेलणकर, समन्वयक स्वप्निल सोनकांबळे, एसबी पाटील पब्लिक स्कूल ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदीप पाटील, एसबी पाटील सीनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्सचे प्राचार्य डॉ. स्मृती पाठक, शाळेचे मुख्याध्यापक रामदास चपटे, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
योगेश भावसार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, राज्यामध्ये प्रथमच अभियांत्रिकीचे शिक्षण मराठी माध्यमातून घेण्याची सुविधा पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील पीसीसीओई महाविद्यालयात उपलब्ध आहे. तसेच येथे बीव्होक चे व्यावसायिक अभ्यासक्रम देखील उपलब्ध आहेत. गेले ३५ वर्ष पीसीईटी ही शैक्षणिक संस्था पीजी टू पीएचडी पर्यंतचे शिक्षण देत आहे. या संस्थेच्या सर्व महाविद्यालयांचा राज्यातील पहिल्या पाच मध्ये समावेश आहे. हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शैक्षणिक कर्ज उपलब्ध मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या सवलतीचा लाभ घ्यावा. या पुस्तकाचा विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी नक्की उपयोग होईल असा विश्वास भावसार यांनी यावेळी व्यक्त केला.
स्वागत अर्चना आव्हाड, सूत्रसंचालन रामेश्वर पवार आणि आभार शुभांगी जाधव यांनी मानले.

Share

Leave a Reply