स्माॅल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांचा सवाल
पिंपरी ः टीम न्यू महाराष्ट्र
भोसरी एमआयडीसीतील अनेक वृक्षांना इंटरनेटच्या वायरिंनी वेढले आहे. वृक्षांवरील या अति क्रमाणामुळे पशुपक्षांचा अधिवास धोक्यात आला आहे. एमआयडीसीसह शहरातील अन्य भागातही असेच चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे वृक्षांवरील जैवविविधतेला धोका निर्माण झाला असतानाही पिंपरी चिंचवड महापालिकेचा उद्यान विभाग आणि पर्यावरण विभाग झोपेचे सोंग का घेत आहे, असा खरमरीत सवाल स्माॅल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी विचारला आहे.
सध्या भोसरी एमआयडीसीतील टी ब्लाॅक १०३ या भागात अनेक वृक्षांना इंटरनेट केबल वायरींनी वेढा घातल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अशा प्रकारामुऴे वृक्षांना धोका निर्माण होत आहे. वृक्षांवरील पक्षांचा अधिवासच नष्ट होत आहे. इंटरनेट केबलसाठी वृक्षांना खिळे टोचले जातात. काही वेळा फांद्या कापल्या जातात. त्यामुळे वृक्षांना इजा पोहोचवली जात आहे. वृक्षांचे संरक्षण आणि संवर्धन आणि कायद्यान्वये वृक्षांवर विद्यूत तारा आणि केबल सोडणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. तसेच यासाठी महापालिका प्रशासनाची रितसर परवानगी घेतली जात नाही. तरीही अशा प्रकारांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होते, हे अनाकलनीय आहे.
भोसरी एमआयडीसीसह शहातील विविध भागात वृक्षांवर विद्यूत तारा आणि इंटरनेट केबल सोडणारे तसेच वृक्षांवर जाहिराती करुन वृक्षांचे विद्रुपीकरण करण्याच्या प्रकारांना तातडीने पायबंद घालावा. तसेच असे प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अभय भोर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.