नगर : टीम न्यू महाराष्ट्र
नीलेश लंके नगर दक्षिणेचा विकास करणार म्हणतात. मात्र, निधी आणायला सरकार स्वपक्षाचे लागते. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे केवळ १० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यातीत पाच जणांचे डिपाॅझिट जप्त होणार आहे. उर्वरित पाच जणांमध्ये कोण निवडून येईल ही शंका असल्याची टीका खासदार डॉ. सुजय विखे यांनी केली.
खर्डा गण बूथ सक्षमीकरण अभियानांतर्गत खर्डा येथील रत्नसुरेश मंगल कार्यालयात कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार प्रा. राम शिंदे, रवी सुरवसे, तालुकाध्यक्ष अजय काशीद, सभापती शरद कार्ले, शहराध्यक्ष पवन राळेभात, सरपंच वैजीनाथ पाटील, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे, सोमनाथ पाचारणे, मनोज कुलकर्णी, विष्णू भोंडवे, पांडुरंग उबाळे उपस्थित होते.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त शिवतीर्थावर आयोजित सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे महायुती अधिक बळकट होणार आहे, तसेच आमदार रोहित पवार यांनाही लक्ष्य केले.
२०१९ मध्ये कर्जत-जामखेडच्या लोकांना वेगवेगळी विकासाची स्वप्ने दाखवली गेली. बारामतीसारखा विकास करू म्हणून केवळ बारामती दर्शन घडवले. परंतु गेल्या साडेचार वर्षांत कसलाही विकास त्यांना करता आला नाही, अशी टीका विखे पाटील यांनी केली.
शिंदे म्हणाले, रोहित पवार मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहतात. मात्र, त्यांना ग्रामपंचायतीचे कायदे नियम माहिती नाहीत. खर्डा ग्रामपंचायतीच्या सरपंचावर अविश्वास ठराव आणण्यासाठी कायद्याचा अभ्यास न करता सदस्यांना पळवून नेले.
कायद्यात अविश्वासाची तरतूद नसल्यामुळे पळवून नेलेले सदस्य पुन्हा बारामतीहून खर्ड्याला आणून सोडावे लागले. राज्यात महायुती सरकार येण्यापूर्वी दोन वर्षांच्या कालावधीमध्ये पवार यांनी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना फक्त त्रास देण्याचे काम केले. खर्डा येथील राष्ट्रवादीचे सोनाजी सुरवसे, धीरज कसबे, आकाश खेडकर, आकाश पवार यांच्या नेतृत्वाखाली १०० युवकांनी भाजपत प्रवेश केला. याकामी भाजपचे रवी सुरवसे यांनी प्रयत्न केले.