चिंचवड : टीम न्यू महाराष्ट्र
समीर लॉन्स, रावेत येथे भारतीय सैन्य दलातील आर्मी ऑर्डनन्स कॉर्पस डे ARMY ORDINANCE CORPS DAY (AOC) यांचा २४९ वा वर्धापन दिवस नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. श्री दिपक मधुकर भोंडवे सोशल फाउंडेशन यांच्या सौजन्याने रावेत- किवळे- विकासनगर- मामुर्डी तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील माजी सैनिक यांच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप हे उपस्थित होते. तसेच भाजपचे माजी गटनेते नामदेव ढाके, रावेत काळेवाडी मंडळ अध्यक्ष सोमनाथ भोंडवे, साउथ इंडियन सेल प्रमुख सुरेश नायर, रावेत काळेवाडी मंडळाचे पदाधिकारी प्रदीप बिजगे, सचिन गावडे, उपाध्यक्ष अजय भोंडवे, निखिल जाधव, तसेच सुरेश भोंडवे, संतोष भोंडवे , सुनील भोंडवे आदी उपस्थित होते. माजी सैनिक साळुंखे, बी. एन. धोत्रे, यु. बी. पाटील, सुनील सूर्यवंशी, आर. के. सिंग, यांनी या कार्यक्रमाचे नियोजन पाहिले.
कार्यक्रमादरम्यान विविध देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले. उपस्थित सर्व माझी सैनिकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सैन्य दलात असताना कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या सर्व वीरांचाही गौरव करण्यात आला. याप्रसंगी शंकर जगताप म्हणाले, राष्ट्राची एकात्मता, सुरक्षा यामध्ये सैन्य दलाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. तसेच सरकारमार्फत भारतीय सैन्य दलातील अधिकारी आणि जवानांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा तसेच भविष्यात राबवण्यात येणाऱ्या धोरणासंदर्भातही माहिती दिली.
सामाजिक कार्यकर्ते दीपक भोंडवे यांनी दोन वर्षांपूर्वीही परिसरातील सर्व माजी सैनिकांना एकत्रित आणून असाच एक आगळावेगळा माजी सैनिक सोहळा साजरा करण्यात आला होता, याची आठवण ज्येष्ठ माजी सैनिक साळुंखे यांनी यावेळी आवर्जून काढली. उपस्थित सर्व माजिक सैनिकांनी दिपक भोंडवे सोशल फाउंडेशनच्या वतीने केलेल्या कार्याचे कौतुकही केले. आयोजक दिपक भोंडवे यांनी उपस्थित सर्व मान्यवर आणि माजी सैनिकांचे आभार व्यक्त करत माजी सैनिकांसाठी यापुढेही कार्य करत राहणार असल्याचे वचन दिले.