पिंपरी ः टीम न्यू महाराष्ट्र
किवळे -विकासनगर येथील साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी संचालित शेठ एच. ए. बरलोटा मेमोरियल विस्डम इंग्लिश मिडीयम हायस्कूलमध्ये दिवगंत शेठ हुकुमीचंद अनराज बरलोटा यांच्या जयंतीनिमित्त शाळेतील पहिली ते दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. तत्पर्वी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बरलोटा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
या वेळी ज्येष्ठ समाजसेवक सुरेश लुणावत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे पेट्रान तुकाराम भोंडवे, संस्थेचे व शाळेचे अध्यक्ष जयशंकर जयसिंग, सचिव ए . के. प्रेमचंद्रन,
खजिनदार जेकब नाडार, खजिनदार के. के. पिल्ले, मुख्याध्यापिका गायत्री धामणेकर, उपमुख्याध्यापिका शर्मिला गायकवाड, सहमुख्याध्यापिका शिरीन कुरियन, संस्थेचे सदस्य व विश्वस्त एन्थोनी स्वामी, दिलीपकुमार नायर आदी उपस्थित होते.
शाळेचे अध्यक्ष जयशंकर जयसिंग यांनी सुरेश लुणावत यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. लुणावत यांनी विद्यार्थ्यांना गुरु मंत्राचा आशय व त्याचे महत्त्व समजावून सांगितले. शेठ हुकुमीचंद बरलोटा यांच्या बद्दलही त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
शेठ बरलोटा यांच्या स्मरणार्थ दरवर्षी शाळेतील १० गरीब गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. या विद्यार्थ्यांच्या नावांची घोषणा या कार्यक्रमात करण्यात आली तसेच बरलोटा यांच्या स्मरणार्थ मागील शैक्षणिक वर्षातील इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गातील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोख १००० रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या स्कुल बसचे पुजन
यावर्षी इयत्ता दहावीत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रांजल पाटील या विद्यार्थिनीचाही या वेळी सत्कार करण्यात आला. संस्थेचे पेट्रान तुकाराम भोंडवे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या स्कुल बसची पूजा करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.