पिंपरी – विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसून संविधान बचाव, देश बचाव असे मोर्चे काढले जात आहेत. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत कोणीही संविधान बदलू शकत नाही. काहीजण म्हणतात यापुढे निवडणूक होणार नाही. ही शेवटची निवडणूक आहे, येथून पुढे हुकूमशाही येणार, हे काय ज्योतिषी आहेत का? देशात लोकशाही आहे. एवढ्या मोठ्या देशात निवडणूक होणार नाही, हे शक्य आहे का? असे उपमुख्यमंत्री अजित पवार
म्हणाले.
मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा समन्वय मेळावा सोमवारी (८ एप्रिल) काळेवाडीत पार पडला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, सुनील शेळके, उमा खापरे, आठवले गटाच्या चंद्रकांता सोनकांबळे यावेळी उपस्थित होते. त्यावेळी पवार बोलत होते.
महाविकास आघाडीतील ठाकरे गटाकडून रिंगणात असलेले संजोग वाघेरे हे राष्ट्रवादीत असताना अजित पवारांचे निकटवर्तीय होते. त्यांनीच वाघेरे यांना तिकडे पाठविले असल्याची चर्चा मतदारसंघात होती. त्यावर पवार यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
कोणत्याही परिस्थितीत मावळमधून महायुतीचा उमेदवार निवडून आणायचा आहे. पिंपरी-चिंचवडमधून जास्त मताधिक्य मिळाले पाहिजे. मी वाघेरे यांना तिकडे पाठविले नाही. मी स्पष्ट आणि खरे बोलणारा आहे. त्यामुळे या अफवांवर विश्वास ठेऊ नका, मावळात धनुष्यबाण चिन्ह चालवायचे आणि निवडून आणायचे आहे. १३ तारखेचे मतदान होईपर्यंत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वाघेरे यांना भेटायला, गप्पा-टप्पा मारायला जाऊ नये, त्याची वेगळी चर्चा व्हायला नको, निवडणुकीचा प्रचार सुरु झाल्यानंतर काही गोष्टी पाळाव्या लागतात. निवडणूक काळापर्यंत मैत्री, नातेसंबंध बाजूला ठेवावेत. ही गावकी-भावकीची निवडणूक नसून देशातील तरुणांची भवितव्य ठरवणारी आहे. गाफील राहू नका, सहाही आमदार महायुतीचे आहेत. उमेदवार कोण आहे. आपल्या पक्षाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून असंतुष्ट राहू नका, एकदिलाने काम करा, ही निवडणूक अतिशय महत्वाची असून मनापासून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.