मुंबई : टीम न्यू महाराष्ट्र
महाविकास आघाडीतील जागावाटपाची घोषणा झाली आहे. चर्चेतल्या सांगली लोकसभा मतदारसंघासह भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई या जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे गेल्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची नाराजी उघड होत आहे. मुंबई काँग्रेसने बुधवारी आयोजित केलेल्या बैठकीला मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनीच दांडी मारल्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली होती.
त्यानतंर गुरुवारी सकाळी वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की, पक्षाने घेतलेल्या निर्णयानंतर आम्ही कामाला लागलो आहोत. आमचं काही म्हणणं असेल तर ते पक्षासमोर मांडू. असं असलं तरी मुंबईचं एक वेगळं अस्तित्व आहे. पक्षसंघटनेत काम करत असताना कार्यकर्त्यांच्याही काही अपेक्षा असतात, त्याचा विचार करण्याची गरज आहे.
वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, मुंबईमध्ये पक्षाला प्रतिनिधीत्व मिळावं ही आमची अपेक्षा आहे. आमच्या पक्षाने कठोर भूमिका घ्यायला पाहिजे होती. मुंबईतलं जागावाटप करताना विश्वासात घेतलं नाही. मुंबईमध्ये पक्ष वाढावा हीच आमची भूमिका असून पक्षापुढे म्हणणं मांडणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
मुंबईत सन्मानजनक जागावाटप होणे गरजेचे होते
मुंबईत सन्मानजनक जागावाटप होणे गरजेचे होते; परंतु उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने मुंबईतील चार जागांवर परस्पर उमेदवार जाहीर केले, अशी काँग्रेसच्या मुंबईतील नेत्यांची नाराजी आहे. त्यातही ज्या दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवर एकेकाळी काँग्रेसचे एकनाथ गायकवाड विजयी झाले होते, त्या जागेवर अनिल देसाई यांना उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेसचे पदाधिकारी नाराज झाले आहेत. ही जागा आपल्याला मिळावी असा आग्रह वर्षा गायकवाडांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी धरला आहे. त्यामुळे वर्षा गायकवाड यांनी नाराजी थेट दिल्लीला फोन करून कळवली असल्याचे समजते.