विधान परिषदेच्या निवडणुकीला ब्रेक लागणार ?

मुंबई : टीम न्यू महाराष्ट्र

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीतील यशाने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे महायुतीवर कुरघोडी करण्यासाठी नाराज आमदारांना आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करुन धक्कातंत्र वापरण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पण त्यापूर्वीच शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सर्वांनाच धक्का दिला आहे.

विधान परिषदेच्या 12 जुलै रोजी 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती आणण्यासाठी शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासंदर्भात कायदेतज्ज्ञांची आज बैठक घेऊन शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने या सगळ्या संदर्भात कोर्टात जाण्याची तयारी सुरू आहे. जर याचिका दाखल केली तर विधान परिषद निवडणूक कायदेशीर पेचात अडकू शकते. विधानसभेच्या निवडणुकात तोंडावर असताना विधान परिषदेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची घाई सुरु असतानाच या नव्या मुद्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आमदार अपात्रता संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. त्यावर अंतिम निर्णय झालेला नसताना विधान परिषद निवडणूक घेणं हे घटनाबाह्य असल्याचा शिवसेना ठाकरे गटाचा दावा आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या 12 जुलै रोजी होणाऱ्या 11 जागांसाठीच्या निवडणुकीला स्थगिती देण्यासाठी ठाकरे गट लवकरच सर्वोच्च न्यायालयात पुन्हा दाद मागण्याच्या तयारीत आहेत.

सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेसंदर्भात खटलाही सुरू आहे. आमदारांवर अपात्रेची टांगती तलवार आहे. त्यामुळे या आमदारांनी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करणे आणि विधान परिषदेचे आमदार निवडून आणणे हे घटनाबाह्य असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचा दावा आहे

याशिवाय पक्ष फुटल्यानंतर काही आमदारांचे प्रतिज्ञापत्र जे सर्वोच्च न्यायालयात आहेत त्यामध्ये ते शिवसेना ठाकरे गटात असल्याची ग्वाही दिल्यानंतरही ते शिंदेंच्या शिवसेनेत गेलेत त्यांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार कसा देणार? असा सवाल सुद्धा शिवसेना ठाकरे गटाकडून उपस्थित केला जात आहे.यासंदर्भात कायदेतज्ज्ञांची आज बैठक घेऊन शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने या सगळ्या संदर्भात कोर्टात जाण्याची तयारी सुरू आहे.

Share

Leave a Reply