कायद्याचा धाक असेल तरच रामराज्य येईल!” – ॲड. अश्विनीकुमार उपाध्याय

पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र

“शिक्षणातून संस्कार आणि कायद्याचा धाक असेल तरच रामराज्य येईल!” असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अश्विनीकुमार उपाध्याय यांनी केलं3.

स्वातंत्र्यवीर सावरकर सदन, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे नुकतेच स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आयोजित तीन दिवसीय छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमालेतील ‘देशहित में पॉंच नए कानून’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफताना ॲड. अश्विनीकुमार उपाध्याय बोलत होते. सनदी लेखापाल मनोजकुमार आगरवाल, मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथन नायर, कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

ॲड. अश्विनीकुमार उपाध्याय पुढे म्हणाले की, “ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेले किमान पन्नास कायदे हे कालबाह्य आणि निरुपयोगी झालेले आहेत. संविधानाच्या पुस्तकात श्रीरामासह अनेक महापुरुषांच्या प्रतिमा आणीबाणीत तुष्टीकरणासाठी काढून टाकण्यात आल्या. आपल्या देशाचे नाव फक्त ‘भारत’च असायला हवे. धर्मांतरण, घुसखोरी, भ्रष्टाचार, अफाट लोकसंख्या, अवैध धंदे, गरिबी अशा अनेक समस्यांवर मात करण्यासाठी नवीन कायदे अस्तित्वात येण्याची नितांत आवश्यकता आहे. डॉक्टरपेक्षाही औषधांनी आजार बरे होतात; त्याप्रमाणे शासन कितीही चांगले असले तरी नियम आणि कायद्यात बदल केल्याशिवाय समस्यांचे निराकरण होणार नाही. यासाठी सर्वात आधी शिक्षणपद्धतीत बदल केला पाहिजे. संविधानातील कलम २१मध्ये बदल करून सर्वांना समान शिक्षण पद्धत अमलात आणली पाहिजे. संपूर्ण देशात राष्ट्रहित जोपासणारा एकच अभ्यासक्रम असला पाहिजे.

जगाच्या तुलनेत आपली लोकसंख्या २०% आहे; मात्र जमीन, पाणी आणि संसाधने अतिशय नगण्य आहेत. त्यामुळे ‘हम दो, हमारे दो और सबके दो’ या नियमाचे कायद्याने कठोर पालन केले पाहिजे. जस्टिस विदिन इयर हा नियम लागू झाला पाहिजे.
कलम २५मध्ये बदल करून धर्मांतरण हा राष्ट्रद्रोह मानला पाहिजे. अवैध धंद्यांना प्रतिबंध तसेच असत्य भाषण हा दंडनीय अपराध मानला पाहिजे.

कायद्यात बदल करण्यासाठी किंवा नवीन कायदे अमलात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणे किंवा लोकप्रतिनिधींकडून संसदेत कायदे संमत करून घेणे हे दोन पर्याय आहेत. संसदेचा पर्याय हा कमी वेळाचा अन् प्रभावी आहे; परंतु त्यासाठी बहुमताची गरज आहे म्हणून नागरिकांनी राष्ट्रहितासाठी मतदान केलेच पाहिजे!” असे आवाहन उपाध्याय यांनी केले.

शिवाजीमहाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. रमेश बनगोंडे यांनी प्रास्ताविकातून पिंपरी – चिंचवड शहरातील सर्वात जुनी आणि चाळिसाव्या वर्षांत पदार्पण करणार्‍या छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमालेची माहिती दिली. सचिन राऊत यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदान करण्याविषयी प्रबोधन केले. शीतल गोखले आणि शिल्पा बिबीकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. मनीषा मुळे यांनी व्यासपीठ व्यवस्था सांभाळली. उज्ज्वला केळकर यांनी सूत्रसंचालन केले. माधुरी ओक यांनी आभार मानले.

Share

Leave a Reply