भाजपा आमदार महेश लांडगे यांचा विधायक उपक्रम ; विविध संस्थांमध्ये १ हजार डझन आंब्यांचे वाटप
भोसरी ः टीम न्यू महाराष्ट्र
‘‘दादा तू आला आणि कुणाला आपल्या आईची आठवण आली… तर कुणाला दूर परदेशात असलेल्या मुलांची…कुणाच्या चेहऱ्यावर हसू उमटले… किमान आजचा एक दिवसतरी..! तुझ्याकडून अशीच लोकांची, वंचितांची सेवा घडो…असा अशिर्वाद देते..बाळा खूप मोठा हो…’’ हे हृदयस्पर्शी शब्द आहेत, एका वृद्धाश्रमातील आजीचे..! निमित्त होते आंबा महोत्सवाचे.
समाजातील दुर्लक्षित आणि निराधार व्यक्तींसोबत सण-उत्सव साजरा झाला पाहिजे, या संकल्पनेतून पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून ‘‘आंबा महोत्सव’’ साजरा करण्यात आला. ‘‘गोडवा आपुलकीचा, अक्षय समाजसेवेचा’’ या संकल्पनेतून शहर आणि परिसरातील वृद्धाश्रम, अनाथाश्रम, दिव्यांग भवन, अंध शाळा असे एकाच दिवशी तब्बल ३० ठिकाणी अबालवृद्धांनी आंब्यांचा आस्वाद घेतला. १ हजारहून अधिक डझन आंबे वाटप करण्यात आले. वडिलधारी मंडळी आणि समाजातून दुर्लक्षीत असलेल्या निराधारांसोबत हा सण साजरा करण्यात आला. विविध स्तरातून या उपक्रमाचे कौतूक होत आहे.
आमदार महेश लांडगे यांच्या सहकाऱ्यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला. प्रमुख ठिकाणी आमदार लांडगे यांनी स्वत: सहभाग घेत अबालवृद्धांसोबत काही क्षण आनंदात साजरे केले. आधुनिक आणि स्पर्धेच्या युगात मानवतेच्या दृष्टीकोनातून प्रत्येकाने खारीचा वाटा म्हणून सामाजिक कार्य करावे, असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.
पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली..!
या वेळी पहलगाम येथे झालेल्या आंतकवादी हल्ल्याचा निषेध आणि बळी गेलेल्या निष्पाप हिंदू बांधवांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली. देशभक्तीपर गीते आणि भारताची एकता टिकवण्यासाठी सर्वांनी भारतीय म्हणून एकत्र आले पाहिजे, असा संकल्प करण्यात आला आणि आंबा महोत्सवाची सुरूवात केली. वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसोबत आमदार लांडगे यांनी आमसर-पुरी भोजनाचा आस्वाद घेतला. त्यांच्याशी संवाद साधला आणि यापुढील काळात आपला मुलगा, बंधू आणि कुटुंबाचा सदस्य म्हणून सर्वोतोपरी मदतीसाठी तत्पर राहील, असा विश्वासही दिला.
पिंपरी-चिंचवड शहरातील ‘‘आंबा महोत्सव’’ साजरा करताना आम्हाला विशेष आनंद झाला. सामाजिक जाणिवेचा संदेश देत हा महोत्सव साजरा करताना मला विशेष आनंद वाटतो. कारण, समाजापासून अलिप्त असलेल्या या अनाथालयातील मुलांच्या चेहऱ्यावर या निमित्ताने हसू आणि वृद्धांच्या चेहऱ्यावर समाधान पहायला मिळाले. अबालवृद्धांसोबत आमरस- पुरी भोजनाचा आस्वाद घेतला. हा आंबा महोत्सव यापुढील काळातही प्रतिवर्षी कायम ठेवण्याचा संकल्प आम्ही केला आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा