पिंपरी :टीम न्यू महाराष्ट्र
अनेक पालक- विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहतात; परंतु उज्ज्वल भविष्यासाठी इतरही अनेक संधी उपलब्ध आहेत. परदेशी भाषा शिक्षणातून विविध प्रकारच्या अनेक रोजगार विद्यार्थ्यांना मिळू शकतात. शैक्षणिक संस्थांनी यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. नोव्हेल इन्स्टिट्यूटने उत्तम आदर्श निर्माण केला आहे. शैक्षणिक संस्थांनी याचे अनुकरण केले पाहिजे. म्हणजे सुजाण, उच्च शिक्षित पिढी निर्माण होईल, असे मत भाषा तज्ज्ञांनी व्यक्त केले.
‘शालेय वयापासून परदेशी भाषा शिक्षण’ या विषयावर नोव्हेल संस्थेच्या वतीने शनिवारी (22 जून) मोफत चर्चासत्राचे आयोजन निगडीतील ग दि माडगूळकर सभागृहात केले होते. यामध्ये फ्रेंच ,जर्मन व इतर भाषांमध्ये करियर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थी व पालकांना तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी. पिंपरी-चिंचवड शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर, रवी राजापूरकर डॉ. शोभना पालेकर, मुक्ती पानसे, नॉव्हेल इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्चचे अध्यक्ष अमित गोरखे, शैलेश लेले,राजेश खरे, एमएनजीएलच्या ऋतूजा पायगुडे, हरिश्चंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.
भाषातज्ज्ञ डॉ. सविता केळकर,सीएसआर संचालक बागेश्री मंथळकर, सीएसआर प्रमुख योगिता आपटे, प्रिया कुलकर्णी, आयआयसीएमआरच्या संस्थापक डॉ. अश्विनी कुलकर्णी, पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष कैलास पवळे, आरआयएएनचे संस्थापक आनंदसागर शिराळकर, अधिष्टी भट या तज्ज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
अमित गोरखे प्रास्ताविकात म्हणाले की, नॉव्हेल इंस्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च गेली बावीस वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी नॉव्हेल इन्स्टिट्यूटने परदेशी भाषा प्रशिक्षण समाजतल्या सर्व स्तरांपर्यंत पोचवण्यासाठी 2019 मध्ये फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन (एफएलओए) ची स्थापना केली. जेव्हा एखादा विद्यार्थी शाळेत प्रवेश घेतो तेव्हा त्याला अभ्यासक्रमातील विविध विषयांची ओळख करून दिली जाते. गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, मराठी, हिंदी, इंग्रजी हे विषय विद्यार्थ्यांनी शिकणे अनिवार्य आहे. विद्यार्थी या विषयांचा प्रारंभिक आणि मध्यवर्ती अभ्यासक्रम शिकतात आणि पुढे जाऊन या विषयांशी संबंधित व्यवसाय निवडू शकतात. या अनिवार्य विषयांच्या व्यतिरिक्त, अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून परदेशी भाषा प्रशिक्षण सुद्धा गरजेचे आहे.
सद्य स्थितीत अशा प्रकारचा अभ्यासक्रम व प्रशिक्षण फक्त ठराविक शाळांमध्ये उपलब्ध आहे. भारतातील बहुसंख्य शालेय विद्यार्थ्यांना ते उपलब्ध नाही आणि जिथे उपलब्ध आहे तिथे परवडणारे नाही. ही गरज ओळखून एफएलओए काही कंपन्या, संस्था यांच्या सहकार्याने परदेशी भाषा शिक्षण देत आहे. सध्या जर्मन आणि फ्रेंच या दोन युरोपियन भाषांमध्ये परदेशी भाषा प्रशिक्षण दिले जाते. महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यातून व भारतातील 22 राज्यांमध्ये एफएलओए काम करत आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये उपक्रम सुरू झाल्यापासून आतापर्यंत सात हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, असे गोरखे यांनी सांगितले.
संगीता बांगर, मुक्ती पानसे, शोभना पालेकर, रवी राजापूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मार्गदर्शक शिक्षक, एफएलओए परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यांचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन अभिजित कुलकर्णी यांनी केले. आभार शैलेश लेले यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.