पुणे ः टीम न्यू महाराष्ट्र
सध्याच्या पुढारलेल्या आणि सुशिक्षित समाजातही महिलांवर सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाच्या घटना सातत्याने घडत असतात. मात्र, आता याउलट परिस्थितीही पाहायला मिळत आहे. पतीचा मानिसक छळ होण्याच्या घटना वाढू लागल्या असून पत्नीच्या छळाला कंटाळेले पती कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी धाव घेऊ लागले आहेत. अशाच एका प्रकरणात पुण्यातील कौटुंबिक न्यायालयाने पतीचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला.
या प्रकरणात पत्नीसा समन्स बजावूनही ती आपली बाजू मांडण्यासाठी न्यायालयात हजर राहिली नाही. त्यामुळे न्यायाधीश वि. के. ठाकूर यांनी पतीला एकतर्फी घटस्फोट मंजूर केला. विशेष म्हणजे नऊ महिन्यात ही निकाल देण्यात आला. या प्रकरणी पतीच्या बाजुने अॅड. शुभांगी प. जेठीथोर यांनी युक्तीवाद केला.
विजय आणि रेखा ( काल्पनिक नावे) यांचा १ मार्च २०१६ ला विवाह झाला. लग्नानंतर रेखा सासरी दोन महिने व्यवस्थित नांदत होती. मात्र, त्यानंतर तिने पतीला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. सकाळी उशिरा उठणे, घरातील कामे व स्वयंपाक न करणे, मोठमोठ्याने ओरडून बोलणे, विनाकारण सासरच्यांना त्रास देणे असे प्रकार रेखा करु लागली. शिवाय विजयला वेगळे घर घेण्यासाठी व आई-वडिलांपासून विभक्त राहून संसार करण्याचा तगादा लावला. त्यानुसार विजयने वेगळे घर घेतले. परंतु, तरीसुद्धा रेखाकडून मानसिक त्रास देणे सुरूच होते.
या सततच्या त्रासातून विजयला मानसिक आजार सुरू झाला. यामुळे त्याला नोकरी गमवावी लागली. दरम्यानच्या काळात रेखा बाळंतपणासाठी माहेरी गेली. मात्र, ती पुन्हा सासरी आलीच नाही. तिला वारंवार बोलवून देखील ती सासरी न आल्याने अखेर विजयने अॅड. शुभांगी प. जेठीथोर यांच्यामार्फत पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने समन्स बजावले व न्यायालयात हजर राहून म्हणणे मांडण्याची संधी दिला. तथापि रेखा न्यायालयात हजर झाली नाही. त्यामुळे घटस्फोटाचा दावा एकतर्फी चालवून न्यायालयाने विजयचा घटस्फोटाचा अर्ज नऊ महिन्यात मंजूर केला.