पुणे : टीम न्यू महाराष्ट्र
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, स्थानिक उत्सव समिती महाड आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची 344 वी पुण्यतिथी, अभिवादन कार्यक्रम चैत्र पौर्णिमा शालिवाहन शके 1946, दिनांक 22 व 23 एप्रिल 2024 रोजी पार पडला. याप्रसंगी पूर्वसंध्येला लोहगड विसापूर विकास मंचाच्या वतीने शिवसमाधी स्थान व जगदीश्वर मंदिर प्रांगणात दीपवंदनेद्वारे महाराजांना अभिवादन करण्यात आले.
तसेच रात्री जगदीश्वर मंदिरात हरी जागर व राजदरबारात इतिहास अभ्यासकांची मुलाखती, सैन्यदलातील अधिकाऱ्यांच्या मुलाखती तसेच शाहिरीचे कार्यक्रम संपन्न झाले. 23 एप्रिल रोजी सकाळी जगदीश्वर मंदिरात महापूजा, हनुमान जयंतीनिमित्त किर्तन व राजदरबारात श्री शिवप्रतिमापूजन केले. यावेळी सैन्यदलातील अधिकारी व सरदार घराणे यांचा सन्मान करण्यात आला. श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार ज्येष्ठ पुरातत्ववेत्ते आणि मूर्तिशास्त्र अभ्यासक डॉ. गो.बं. देगलूरकर यांना जाहीर करण्यात आला होता. सदर पुरस्कार त्यांना पुण्यातील कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावर्षी शिवपुण्यतिथी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज मोरे (देहूकर) उपस्थित होते.
राजदरबारातील कार्यक्रमानंतर श्री शिवप्रतिमा पालखी मिरवणूक पार पडली. त्यानंतर शिवसमाधी स्थानावर श्री शिवछत्रपतींना मानवंदना सर्व शिवभक्त व रायगड जिल्हा पोलीस प्रशासन यांच्यामार्फत देण्यात आली.श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात, सरकार्यवाह पांडुरंग बलकवडे ,अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे त्याचबरोबर, स्थानिक उत्सव समिती महाडचे कार्यवाह संतोष कदम, अध्यक्ष त्रिंबक पुरोहित यांनी या कार्यक्रमाचे नियोजन पार पाडले. या कार्यक्रमात शिवसमाधी व जगदीश्वर मंदिरात दीपवंदना या कार्यक्रमाची जबाबदारी लोहगड विसापूर विकास मंचाकडे होती अशी माहिती मंचचे संस्थापक सचिन टेकवडे व अध्यक्ष विश्वास दौंडकर यांनी दिली. जगदीश्वर मंदिरातील दीपवंदना प्रमुख पाहुणे श्री पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी तसेच, शिवसमाधी स्थानावरील दीपवंदना सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे वंशज कर्नल समीर गुजर यांचे हस्ते करण्यात आली. हजारो दिव्यांनी शिवसमाधी व जगदीश्वर मंदीर परिसर उजळून निघाला होता. त्यामुळे वातावरण शिवमय झाले होते.
उपस्थित सर्व शिवप्रेमी समाधी स्थानावर नतमस्तक झाले. दीपवंदनेचे नियोजन संस्थापक सचिन टेकवडे, अध्यक्ष विश्वास दौंडकर, अनिकेत आंबेकर, महेश सोनपावले, अजय मयेकर, संदीप भालेकर, सिद्धेश जाधव आणि सहकारी कार्यकर्त्यांनी केले होते.