पुणे : टीम न्यू महाराष्ट्र
पुण्यात आलिशान पोर्श कार बेदरकारपणे चालवून अल्पवयीन चालकाने एका दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली होती. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तीव्र पडसाद उमटले. यानंतर आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. तसेच आरोपीच्या वडीलांनाही अटक करण्यात आली. या सर्व घटनेत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा अपघात घडला त्यादिवशी सकाळी ११ वाजता ससून रुग्णालयात आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. मात्र, या रक्ताच्या नमुन्यामध्ये फेरफार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत घेत यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
पोलीस आयुक्त म्हणाले “१९ तारखेला ११ वाजता आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यामध्ये फेरफार करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. रक्ताचे नमुने घेतल्यानंतर त्या रक्ताचे नमुने ससून हॉस्पिटलच्या डस्टबिनमध्ये टाकण्यात आले आणि दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले. दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताच्या रिपोर्टवर डॉक्टरांनी या अपघाताच्या घटनेतील अल्पवयीन आरोपीचे नाव टाकून ते फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले होते”, अशी धक्कादायक माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
“पोर्श कार अपघात प्रकरणात आता ससून हॉस्पिटलमधील डॉ. श्रीहरी हलनोर आणि ससूनचे फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे एचओडी अजय तावरे यांना अटक करण्यात आली आहे. रक्ताच्या नमुन्यामध्ये अजय तावरे यांच्या सूचनेनुसार रक्ताचे नमुने बदलले असल्याचे आढळून आहे”, अशी धक्कादायक माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस आयुक्त पुढे म्हणाले की, आम्ही आरोपीचे एक रक्ताचे नमुने औंध येथील सरकारी रुग्णालयात पाठवले होते. त्या रिपोर्टमध्ये आरोपीची रक्ताचे नमुने आणि आरोपीच्या वडिलांच्या रक्ताचे नमुन्याशी मॅच झाली आहेत. मात्र, ससून हॉस्पिटलच्या रिपोर्टमध्ये आरोपीच्या रक्ताचे नमुने हे मॅच झाली नाहीत. त्यामुळे आम्हाला संशय आल्यानंतर आम्ही चौकशी केली असता यामध्ये फेरफार आल्याचे आढळून आले. त्यानंतर ससून हॉस्पिटल येथील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणात जे दुसऱ्या व्यक्तीचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते, ते नेमकी कोणाचे आहेत? याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येणार आहे”, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.