पिंपरी: टीम न्यू महाराष्ट्र
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) हिंजवडी येथील अनधिकृत १० बार अँड रेस्टो आणि रूफ टॉप हॉटेलवर बुलडोझर फिरवण्यात आला. गेल्या सहा महिन्यांपासून थंड असलेल्या प्राधिकरणाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने ही कारवाई केली. नुकत्याच केलेल्या कारवाईत जवळपास ९७ हजार ८१५ चौरस फुटाचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.
गेल्या अनेक दिवसांपासून पीएमआरडीए अतिक्रमण विरोधी पथकाला पूर्ण वेळ अधिकारी मिळत नव्हता. परिणामी, सुनावण्या आणि अतिक्रमण कारवाई थंड झाली होती. निवडणुकीच्या काळात आचारसंहितेमुळे कारवाई करता येत नव्हती. मंगळवारी मतमोजणी पार पडली. त्यांनतर गुरुवारी सकाळपासून अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. अतिक्रमण विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते. जानेवारी महिन्यामध्ये महाळुंगे परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई केली होती. तर, ऑक्टोबर २०२३ मध्ये हिंजवडी परिसरातील लक्ष्मी चौक या ठिकाणी अतिक्रमण काढले होते. त्यानंतर आता म्हणजे जवळपास सहा महिन्यांनी कारवाई करण्यात आली. त्यात हिंजवडी (ता. मुळशी) येथील गट नंबर २१, २८, २९ मधील ०८ अनधिकृत बार अँड रेस्टो व २ रूफ टॉप बार अँड रेस्टोवर कारवाई सुरू करण्यात आली. या ठिकाणचे ९७, ८१५ चौ.फूट क्षेत्रावरील अनधिकृत पब, रेस्टॉरंट व बार पोकलेन, जेसीबी व मनुष्यबळाच्या सहाय्याने पाडण्यात आले. अशीच कारवाई इथून पुढे सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
पीएमआरडीए हॅपी दा पंजाब, हशश कॅफे बार, रिओ किचन अँड बार, फवेरा गॅस्ट्रो बार, मरिन ड्राईव्ह स्काय बार, हॉटेल एफ एम एल, बिलेनियर रेस्टो बार, द कम्युनिटी टेबल, एजंट जॅक्स, डी हेम्स या १० पब आणि रेस्टोवर कारवाई करण्यात आली.
————————————————————–
निवडणुका संपल्यानंतर तातडीने अतिक्रमण कारवाई हाती घेण्यात आली आहे . प्राधिकरण हद्दीतील उर्वरित सर्व पब, बार व रेस्टॉरंट्स यांचा सर्व्हे चालू असून अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई सुरूच राहणार आहे.
– अनिल दौंडे, सह-आयुक्त ,अतिक्रमण व निर्मूलन पथक, पीएमआरडीए