पनवेल तालुक्यातील चिखले ग्रामस्थांचा खासदार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा

पनवेल: टीम न्यू महाराष्ट्र

पनवेल तालुक्यातील चिखले या गावातील ग्रामस्थांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना एकमुखी पाठिंबा जाहीर केला.

खासदार बारणे यांनी दुपारी चिखले गावात भेट दिली. त्यावेळी ग्रामस्थांनी फटाके वाजवून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात झालेल्या कार्यक्रमात ग्रामस्थांच्या वतीने बारणे यांना एकमुखी पाठिंबा जाहीर करण्यात आला. चिखले गावच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढेही आपले भरीव योगदान राहील, अशी ग्वाही खासदार बारणे यांनी यावेळी दिली.

गाव एकत्र आला की, इतिहास घडू शकतो. ग्रामस्थांनी गावातील ही ऐक्याची भावना अबाधित ठेवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला महिलांची संख्या मोठी असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यामुळे महिलांनीही मोदी यांना पाठबळ द्यावे, असे आवाहन बारणे यांनी केले.

सरपंच दिपाली दत्तात्रय तांडेल व त्यांचे पती दत्तात्रय तांडेल यांनी खासदार बारणे यांचा सत्कार केला. त्यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, तालुकाप्रमुख रुपेश ठोंबर, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख मेघाताई दमडे तसेच मंदाताई जंगले, कुंदाताई गोळे, संध्याताई पाटील प्रभाकर नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Leave a Reply