पुणे : टीम न्यू महाराष्ट्र
घरची बिकट आर्थिक परिस्थिती असलेल्या दोन वेगवेगळ्या कुटुंबातील शिवाज्ञा सातपुते या एक वर्षाच्या आणि समर्थ देवकर या तीन वर्षाच्या चिमुकल्यांची हृदयाशी निगडीत अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टच्या सहकार्याने करण्यात आल्या. जहांगीर हॉस्पिटल मध्ये तब्बल पाच ते सहा तास चालेल्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे झाल्या आहेत. शस्त्रक्रियेनंतर जहांगीर रुग्णालयाचे विश्वस्त, पदाधिकारी व दोन्ही कुटुंबांनी मंदिरात गणरायाचे दर्शन घेत आरती केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत आर्थिक परिस्थिती नसलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया विविध रुग्णालयात करण्यासाठी पुढाकार घेतला जातो. त्याअंतर्गत दोन चिमुकल्यांच्या यशस्वी शस्त्रक्रिया नुकत्याच जहांगीर रुग्णालयात झाल्या. त्यानंतर मंदिरात आरती करण्यास जहांगीर हॉस्पिटल चे चेअरमन डॉ.एच.सी.जहांगीर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विनोद सावंतवाडकर, गोपाळ फडके, डॉ. अशोक घोणे, ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.डॉ.एच.सी.जहांगीर म्हणाले, दगडूशेठ गणपती बाप्पाच्या आशिर्वादाने दोन्ही चिमुकल्यांची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. दगडूशेठ गणपती ट्रस्टचे रुग्णसेवेचे कार्य खूप मोठे असून आम्ही कायम या कार्याला पूर्णपणे सहकार्य करू.महेश सूर्यवंशी म्हणाले, ट्रस्ट आणि विविध रुग्णालयांच्या माध्यमातून गरजूंना विनामूल्य आरोग्य सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नुकतेच दोन लहान मुलांची जी हृदयशस्त्रक्रिया झाली, ती दोन्ही कुटुंबे ग्रामीण भागातील आहेत. या एका शस्त्रक्रियेचा खर्च 7 ते 8 लाख रुपये इतका होता. मात्र, त्यांना विनामूल्य शस्त्रक्रिया करून देण्यात आली. गरजू रुग्णांनी ट्रस्टच्या कार्यालयात संपर्क साधावा, त्यांना आवश्यक ती मदत देण्याचा प्रयत्न ट्रस्ट नक्कीच करेल, असेही त्यांनी सांगितले.