पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारीचा पायी पालखी सोहळा आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, आळंदीतील इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली आहे. त्याकडे महापालिका पर्यावरण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. चिखली, कुदळवाडीतील कंपन्या सांडपाणी
प्रक्रिया न करता थेट इंद्रायणीत सोडत असल्यामुळे नदी प्रदूषित होत असून आळंदी, देहू, तुळापूर अशा प्रमुख तीर्थक्षेत्रांचा नदीकाठ फेसाळलेला आहे. अशा फेसाळलेल्या नदीत वारकरी बांधव एकादशीच्या दिवशी स्नान करणार का असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला अध्यक्ष प्रा. कविता आल्हाट यांनी विचारला असून अशा कंपन्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत निवेदनाद्वारे
प्रा. कविता आल्हाट यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे लक्ष वेधले आहे. याबाबत पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांना भेटून आल्हाट यांनी
निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे
इंद्रायणी नदीच्या काठावर आळंदी, देहू, तुळापूर अशी प्रमुख तीर्थक्षेत्रे आहेत. तेथे लाखो वारकरी येत असतात. इंद्रायणीस्नान, नगरप्रदक्षिणा, माउलींचे दर्शन असा वारकऱ्यांचा अलिखित नियम आहे. गेल्या वर्षभरात इंद्रायणी नदी अनेकदा फेसाळली आहे. शनिवारी सकाळी नदीला पुन्हा फेस आला आहे.
पवित्र इंद्रायणी नदी आपल्या पिंपरी चिंचवड शहरातून वाहते. चिखली हद्दीतील कुदळवाडी भागातील नाल्यांमधून रसायनमिश्रित सांडपाणी नदीमध्ये मिसळले जात आहे. या रसायनांमुळे नदीतील पाणी प्रचंड प्रमाणात प्रदूषित होत आहे. नदीत मोठ्या प्रमाणावर फेस येत आहे. महानगरपालिकेने पूर्वीही संबंधित प्रदूषित पाणी , रसायने नाल्यांद्वारे नदीमध्ये सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई केली आहे. परंतु तरीही नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर रसायनमिश्रित सांडपाणी येत आहे. याबाबतीत अशा कंपन्यांवर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे.
पुढील आठ दिवसांत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा आहे. राज्यभरातून बहुसंख्येने वारकरी भाविक देहू-आळंदी क्षेत्री येतात. पवित्र इंद्रायणीमध्ये स्नान करतात नदीच्या वरच्या भागातील धरणांतून नदीत पाणी सोडल्यास हे सांडपाणी मिश्रित पाणी आळंदीतील भाविकांसाठी आरोग्यास अपायकारक होऊ शकते. त्यामुळे नदीपात्रात जाणारे सांडपाणी थांबविणे आवश्यक आहे असे आल्हाट यांनी म्हंटले आहे.